सर्जन म्हणून काम करताना आजवरच्या अनुभवाने खूप प्रसिद्धी मिळाली. एक अशी गोष्टही मिळाली ज्याची मोजदाद करता येणार नाही. ती म्हणजे समाजातील विविध वृत्ती-प्रवृत्तीनची अगदी जवळून झालेली ओळख.

वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया जरी एक व्यक्ती करत असली तरी त्या व्यक्ती सोबत समाजातील विविध प्रवृत्ती घेऊन येतात. मग लठ्ठ व्यक्तींबरोबरचा समाज कसा आहे?

बायकोला तिच्या वाढलेल्या वजनाबद्दल दूषणे देणारा नवरा असो की मुलीचे वजन हाताबाहेर वाढूनही तिला अजून खाऊ घालणारा वडील असो असे अनेक स्वभाव दिसले.

Bariatric surgery चा निर्णय घेणाऱ्या व्यक्तीला खरी आवश्यकता असते ती मैत्रीपूर्ण योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन याची. पण त्यांना सामोरे जावे लागते विरोध, दूषण, गैरसमज आणि भीती ह्या नकारात्मक गोष्टींना.
एक सर्जन म्हणून आम्ही कायम मदतीला तयार असतोच पण सगळीकडे पोचणे अवघडच.

हे जाणवत असतांना लक्ष गेले ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टीवर विजय मिळवून मस्त आनंदी जगणाऱ्या आमच्याच पेशंटसकडे. त्यांच्याकडे बघितल्यावर जाणवले हे आहेत खरे हिरो! ह्यांच्या सत्य कथांमध्ये खरा दम आहे. सकारात्मक ऊर्जा आहे. वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया करू का नको असा विचार करत कुंपणावर बसलेल्यानसाठी ह्यांच्या कथा खरी प्रेरणा आहेत म्हणून प्रयोजन केले सपोर्ट ग्रुपचे.

लठ्ठपणा हा जितका शारीरिक आहे त्याहीपेक्षा तो मानसिक जास्त आहे. न खाणाऱ्या किंवा कमी खाणाऱ्या व्यक्तीचे वजन वाढलेले मी अजून बघीतलेले नाही. पण सत्याला सामोरे न जाता भलत्याच पावडर, तेल इ. चा आधार घेणारे दिसतात आणि मन अस्वस्थ होते. गरज आहे आपण आपला आणि समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची आणि खुलेपणाने ह्या वाढलेल्या वजनाला सामोरे जाण्याची.

असे जगावे दुनियेमधे आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग त्याला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर.

#freedomfromobesity #Obesitysupportgroup #Surgeryforweightloss #Bariatricsurgery